‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याच्या निर्णयापासून मनसेचे घूमजाव

मुंबई / प्रतिनिधी
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना आलेल्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व 22 ऑगस्ट रोजी ‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेने अचानक आपला निर्णय बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहार प्रकरणी ‘ईडी’ ने राज यांना नोटीस बजावली आहे. सत्ताधारी भाजप राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याची मनसैनिकाची भावना आहे. भाजपच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून मनसेने 22 ऑगस्ट रोजी ‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यभरातील मनसैनिकांना ‘ईडी’च्या कार्यालयासमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होते. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र मनसेने अचानक हा शांतता मोर्चा रद्द केला आहे.

आज मनसेची महत्त्वाची बैठक पक्षाच्या ‘राजगड’ मुख्यालयात पार पडली. त्यात भाजपच्या दबावाच्या राजकारणाला न डगमगता; पण शांततेच्या मार्गाने उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. अगोदर मनसेचे कार्यकर्ते व विरोधकही त्यांच्या चौकशीच्या वेळी ‘ईडी’च्या कार्यालयासमोर जमतील, असे ठरले होते; परंतु नंतर राज यांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन आता मनसेने चौकशीच्या वेळी हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे बंद व अन्य आंदोलनेही पुकारण्यात आली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता होती. राज यांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारनेही सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.
चौकट
योग्य वेळी बोलूः राज
ःःःःःःःः..
ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ‘माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळे येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा. कुणीही ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमू नका. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न झाला, तरी शांत राहा. बाकी या विषयावर मला जे बोलायचे आहे ते योग्य वेळी बोलेनच,’ असे राज यांनी म्हटले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *