नाईक समर्थकांच्या बॅनरवर दोन्ही आमदारांचा फोटो नाही; भाजप पक्ष कार्यालयाने घेतली दखल

Spread the love

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक ११ सप्टेंबरला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यासाठी त्यांच्या समर्थकांनी बॅनर तयार करून समाज माध्यमांवरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे.

या बॅनरवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व विधान परिषद सदस्य रमेश पाटील यांचे छायाचित्र नाही. यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप पक्ष कार्यालयानेही याची दखल घेतली आहे. वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये बुधवारी गणेश नाईक व त्यांचे समर्थक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याला गर्दी करावी यासाठी नाईक समर्थकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नवी मुंबई भाजप परिवार व संयोजक नवी मुंबई भारतीय जनता पार्टी परिवार या नावाने बॅनर तयार करून ते समाज माध्यमांवर टाकले जात आहेत. या बॅनरवर गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, अनंत सुतार व भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांचे छायाचित्र आहे. परंतु बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे छायाचित्र या बॅनरवर दिसत नाही.

पक्षाचे आमदार व विधान परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांचे छायाचित्रही वापरण्यात आलेले नाही. यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्ष शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. यामुळे नाईक समर्थकांनीही पक्षात प्रवेश केल्यानंतर शिस्तीचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बॅनरची पक्ष कार्यालयानेही दखल घेतली आहे.
शिस्त पालनाविषयी सूचना दिल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पक्षप्रवेशाविषयी नाईक परिवार किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत बॅनर किंवा होर्डिंग बनविण्यात आलेले नाहीत. समर्थक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून असे बॅनर टाकले असतील तर त्याची माहिती घेतली जाईल. अधिकृतपणे बॅनर बनविताना पक्षशिस्तीप्रमाणे काम केले जाईल. – अनंत सुतार, नगरसेवक, नवी मुंबई महापालिका

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *