शुश्रूषा रूग्णालयाला मिळणार २५ कोटींचे भागभांडवल; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Spread the love

मुंबई : मुंबईतील शुश्रुषा सिटीझन को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल या संस्थेला रूग्णसेवा व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २५ कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे भागभांडवल टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शुश्रुषा रूग्णालयात दरवर्षी सुमारे ६० हजार बाह्य रूग्णांना व सहा हजार आंतररूग्णांना सेवा पुरविली जाते. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना मोफत तसेच गरीब रूग्णांना सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या रूग्णालयाला १९६६ ते १९८८ दरम्यान सहकार खात्यातर्फे पाच टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आलेले पंधरा लाखांचे भागभांडवल संस्थेने परत केले आहे.
सेवा विस्तारासाठी अधिकच्या भागभांडवलाची आवश्यकता होती. त्यासाठी २५ कोटींचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे.

भातसा प्रकल्पासाठी ४९१ कोटी रुपये
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पास २०१७-१८ च्या दरसूचीनुसार एक हजार ४९१ कोटींची सहावी सुधारित प्रशासकीय मान्यता आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

भातसा प्रकल्पांतर्गत भातसा नदीवर धरण बांधणे, मुमरी नदीवर शहापूर तालुक्यातील सारंगपुरी येथे मुमरी धरण बांधणे, भातसा उजवा व डावा कालवा बांधणे आणि १५ मेगावॅट वीज निर्मितीसाठी विद्युतगृह बांधणे प्रस्तावित आहे.

दरम्यान एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार प्रकल्पाचा पाणीवापर ७१६.१२ द.ल.घ.मी. इतका असून बिगर सिंचन पाणी आरक्षण ७५५.४८ द.ल.घ.मी. इतके आहे. त्यामुळे सहाव्या मान्यतेमध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यास डावा कालवा १७ किमीपर्यंत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

तसेच उर्वरित कालवे व वितरण व्यवस्थेची कामे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ९१९० हेक्टर इतके प्रस्तावित करण्यात आले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *