युवा ‘टीम इंडिया’ सातवे आसमान पे; किताबी लढतीत बांगलादेशवर रोमहर्षक विजय

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी आम्हीच राजे असल्याचे दाखवून दिले . ‘ टीम इंडिया च्या युवा शिलेदारांनी किताबी लढतीत बांगलादेशवर थरारक विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला . हिंदुस्थानचा डाव 32.4 षटकांत 106 धावांवर गडगडल्यानंतर बांगलादेशला 33 षटकांत 101 धावांत गुंडाळून हिंदुस्थानने सनसनाटी विजय मिळवला . या अशक्य वाटणाऱ्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला .

बेस्ट कंडक्टरच्या मुलाची कमाल

किताबी लढतीत सामनावीर ठरलेल्या अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर हे बेस्टमध्ये कंडक्टर होते , मात्र वयाच्या नवव्या वर्षी अथर्वचे पितृछत्र हरपले . अथर्वची आई वैदेही अंकोलेकरही बेस्टमध्येच कंडक्टर आहेत , मात्र या सामान्य कुटुंबातील मुलाने युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कमाल केली . हिंदुस्थानच्या 106 या अतिशय असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना अथर्वने मोलाची भूमिका बजावली . हिंदुस्थानसाठी क्रिकेटची खाण असलेल्या मुंबईमधून आणखी एक स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर उदय होत आहे .

हिंदुस्थानचा डाव गडगडला

कर्णधार धुव जुरेलने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय हिंदुस्थानच्या चांगलाच अंगलट आला . हिंदुस्थानचा डाव 32.4 षटकांत 106 धावांवर गडगडला . पाच फलंदाजांना केवळ एकेरी धावा करता आल्या तर तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही . धुव जुरेल (33) व शाश्वत रावत (19) या मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला . शेवटी करण लालने 37 धावांची खेळी केली म्हणून हिंदुस्थानला धावांची शंभरी ओलांडता आली . बांगलादेशकडून मृत्युंजय चौधरी व शमीम होसैन यांनी 3-3 फलंदाज बाद केले , तर तंझीम हसन व शाहीम अलम यांनी 1-1 बळी टिपला .

फलंदाजांनी गमावले ते गोलंदाजांनी कमावले

बांगलादेश 107 धावांचे लक्ष्य सहज गाठणार असेच सर्वांना वाटत होते , मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल केली . पहिल्या षटकापासून बांगलादेशला हादरे बसायला सुरुवात झाली अन् बघता बघता त्यांची 4.1 षटकांत 4 बाद 16 अशी दुर्दशा उडाली . येथूनच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या . कर्णधार अकबर अली (23) व मृत्युंजय चौधरी (21) यांनी काही वेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करीत बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला . हे दोघे लागोपाठच्या षटकांत बाद झाल्यानंतर बांगलादेशची 21.1 षटकांत 8 बाद 78 अशी दाणादाण उडाली . तरीही तंझीम हसन (12) व रकीबुल हसन ( नाबाद 11) या तळाच्या फलंदाजांनी अनपेक्षित प्रतिकार केल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली . बांगलादेशला विजयासाठी 6 धावांची गरज असताना अथर्व अंकोलेकरने 33 व्या षटकात तंझीमला बाद करून हिंदुस्थानच्या मार्गातील उरलेला अडसर दूर केला . त्यानंतर आलेल्या शाहीम आलमचेही अखेरच्या चेंडूवर दांडके उडवून बांगलादेशचा डाव संपवला अन् हिंदुस्थानच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले . या विजयाचा हीरो ठरलेल्या अथर्वने 28 चेंडूंत 5 फलंदाज बाद केले . आकाश सिंगने 3, तर विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी 1-1 गडी बाद करून विजयास हातभार लावला .

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Saamana

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis