विश्वचषकासाठी भारताची शोधमोहीम; भारत- द. आफ्रिका टी-२० सामना आज

धर्मशाला : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज, रविवारपासून द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून, मालिकेद्वारे विश्वचषकासाठी युवा खेळाडूंचा शोध घेण्याची ही तयारी मानली जात आहे.
विंडीजविरुद्ध मालिका ३-० ने जिंकून भारतीय संघाने वन डे विश्वचषकातील निराशा काही प्रमाणात झटकली होती. संघाची खरी परीक्षा क्विंटन डिकॉक आणि कासिगो रबाडा यांच्याविरुद्ध होईल. रबाडाचा मारा आणि डेव्हिड मिलरची फटकेबाजी यांना आळा घालण्याचे अवघड आव्हान भारतापुढे राहील. फाफ डुप्लेसिस आणि हाशिम
अमला या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पाहुण्या संघाने टेम्बा बावुमा आणि एन्रिको नॉर्जे यांना संधी दिली आहे.
पुढील वर्षी आॅक्टोबर महिन्यात आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी योग्य संयोजन तयार करण्यासाठी मुख्य कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडे केवळ २० सामने शिल्लक आहेत. पुढील १३ महिन्यांत आयपीएलमधील टॅलेंटसह संघबांधणी करण्याचे लक्ष्य संघ व्यवस्थापनाने आखले आहे.
कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पांड्या, मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा अपवाद वगळता युवा खेळाडूंना किमान सात स्थानांसाठी चढाओढ करावी लागणार आहे. धोनीची निवृत्ती हा त्याचा वैयक्तिक निर्णय ठरणार असला तरी, ऋषभ पंत हा देखील अद्याप शास्त्री आणि कोहली यांच्या विश्वासास पूर्णपणे पात्र ठरलेला नाही.
मनीष पांडे काही महिन्यांपासून संघासोबत आहे, पण ज्या संधी मिळाल्या त्यातून तो आत्मविश्वास मिळवू शकला नाही. चौथ्या स्थानासाठी पांडे किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाचा विचार शक्य आहे.
याशिवाय झटपट प्रकारासाठी युजवेंद्र चहल की कुलदीप यादव यांच्यापैकी उपयुक्त कोण, यावर खलबते होणार आहेत. कृणाल पांड्या हा सांघिक कामगिरीत उपयुक्त ठरतो तर रवींद्र जडेजा अनुभवाच्या आधारे मॅचविनर ठरतो. या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर हा देखील बॅकअप फिरकीपटू आहे. त्याला अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही. बुमराहच्या सोबतीला वेगवान माऱ्यासाठी दीपक चाहर, नवदीप सैनी आणि खलील अहमद ही अन्य नावे आहेत. या सर्व नवोदित खेळाडूंना पारखण्याची ही संधी असेल. कोहलीला या चेहऱ्यांमधून विश्वचषकासाठी संघबांधणी अपेक्षित असेल.
>उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डिकॉक (कर्णधार), रासी वान डर दुसेन (उपकर्णधार), टेम्बा बावुमा, ज्युनियर डाला, ब्योर्न फोरटुइन, बेयुरन हेन्ड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रिक नॉर्जे, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, कासिगो रबाडा, तबरेज शम्सी आणि जॉर्ज लिंडे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmat

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis