सामना अग्रलेख – दोन मेळावे; दोन परंपरा, चिंता झुंडबळींची

आम्ही धर्म आणि राष्ट्राची संकल्पना मांडतो , पण धर्म व राष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रातील माणसे जिवंत ठेवायला हवीत , त्यांच्या चुली पेटवायला हव्यात . तरच धर्माचा झेंडा ते खांद्यावर घेऊन मिरवतील . ही आमची परंपरा आहे . झुंडबळी ही हिंदुस्थानच्या हिंदूंची परंपरा नाही असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले . तरीही झुंडबळी होत असतील तर सरसंघचालकांनाच हातात लाठी घेऊन यावे लागेल . गोमांसाचे कंटेनर्स परदेशात जात आहेत , पण गोमांस खाल्ल्याच्या संशयापोटी झुंडबळीचे प्रकार वाढत आहेत . हे बरे नाही . दोन मेळाव्यात दोन भूमिका मांडल्या गेल्या . त्या देशहिताच्याच आहेत .

महाराष्ट्रात दोन पारंपरिक मेळावे पार पडले.
रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला, तर मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे गाजला. हे दोन्ही मेळावे विजयादशमीस होत असतात. त्यांतून दोन्ही संघटनांच्या पुढील वाटचालीची दिशा मिळत असते. रेशीम बागेतील संघ मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, ‘लिंचिंग’ शब्द आपला नाही. तो बाहेरून आला आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांशी संघ स्वयंसेवकांचा संबंध नाही. झुंडबळी ही हिंदुस्थानची परंपरा नसल्याचे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. संपूर्ण देश आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची खंत श्री. भागवत यांनी व्यक्त केली. भागवत यांच्या बोलण्यात तथ्य आहे. देशात गेल्या दोन-चार वर्षांत ‘झुंडबळी’च्या घटना घडल्या आहेत. त्यामागे ‘गोहत्या’, गोमांस खाणे, बाळगणे हे प्रकार आहेत. गोमांस बाळगण्यावरून मुसलमान समाजातील काही तरुणांचे ‘मॉब लिंचिंग’ म्हणजे झुंडबळी झाले आहेत. भररस्त्यावर हे बळी गेले. अशा झुंडबळींवर पंतप्रधान मोदी यांनीही चिंता व्यक्त केली व गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे सांगितले, पण यापैकी काही गुन्ह्यांतले लोक न्यायालयाने निर्दोष सोडले. झुंडबळी रोखण्यास कायदा तोकडा पडला. गोहत्या, गोमांस राखणे, खाणे, त्याचा व्यापार करणे याचा संबंध हिंदुस्थानी

संस्कृती व हिंदुत्वाशी

जोडण्यात येत आहे. पण चारेक दिवसांपूर्वी एक धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार गोमांस निर्यात करणाऱ्या देशात हिंदुस्थानचा नंबर जगात पाचवा आहे. मग हे कसे? निर्यात व्यापार अधिकृत होतो. जंगलात, डोंगरात लपून छपून गोहत्या करून गोमांस परदेशात पाठवता येणार नाही. सरकारमान्य कसाईखान्यात गोहत्या करून त्यावर सर्व रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर मोठमोठय़ा कंटेनर्समध्ये भरून सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच हे गोमांसाने भरलेले कंटेनर्स परदेशी पाठवले जातात. कंटेनर्समध्ये गोमांस असताना त्यात कोंबडी, बकरे किंवा सशाचे मांस आहे अशी खोटीच कागदपत्रे बनवून ते पाठवता येणे शक्य नाही. जगात गोमांस निर्यातीत आपल्या देशाचा पाचवा नंबर लागत असेल तर याचा अर्थ रोज लाखो गोमातांची कत्तल होत आहे. गोवंश मारला जात आहे व त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. गरीबांचे झुंडबळी येथे होतात, पण कंटेनर्स भरून गोमांस बाहेरच्या देशात जाते त्यावर कोणी बोलत नाही. सरसंघचालकांकडून यावर मार्गदर्शनाची अपेक्षा होती. कारण गोमांसावरून झुंडबळी ही काही आमची परंपरा नाही. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. याचा अर्थ संघ मुसलमान किंवा ख्रिश्चन विरोधी आहे असा होत नाही. ज्यांच्यापर्यंत संघाचे काम पोहोचलेले नाही, ते संघाबद्दल इतरांना भीती घालतात. शिवसेनेच्या बाबतीतही

नेमके तेच

होत असते. शिवसेना सर्वव्यापी आहे, पण प्रखर हिंदुत्ववादी आहे. शिवसेनेने राष्ट्रवाद मांडताना सर्व जाती-धर्मांना भगव्या झेंडय़ाखाली ठेवले. पोटाला जात चिकटवू नका. वंदे मातरम्, भारतमाता की जय म्हणेल तो देशाचा सुपुत्र ही आमची भावना. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आम्ही समान नागरी कायदा, 370 कलम, पाकव्याप्त कश्मीर आणि राम मंदिरासारख्या मुद्दय़ांवर संघर्ष करीत असताना शिवसेनेने 10 रुपयांत थाळी आणि फक्त एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणीची कल्पना मांडली. बुधवारी आम्ही संगमनेर भागात शेतकऱ्यांसमोर बोलताना आणखी एक वचन दिले, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला दहा हजार रुपये जमा करण्याचे. आम्ही धर्म आणि राष्ट्राची संकल्पना मांडतो, पण धर्म व राष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रातील माणसे जिवंत ठेवायला हवीत, त्यांच्या चुली पेटवायला हव्यात. तरच धर्माचा झेंडा ते खांद्यावर घेऊन मिरवतील. ही आमची परंपरा आहे. झुंडबळी ही हिंदुस्थानच्या हिंदूंची परंपरा नाही असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले. तरीही झुंडबळी होत असतील तर सरसंघचालकांनाच हातात लाठी घेऊन यावे लागेल. गोमांसाचे कंटेनर्स परदेशात जात आहेत, पण गोमांस खाल्ल्याच्या संशयापोटी झुंडबळीचे प्रकार वाढत आहेत. हे बरे नाही. दोन मेळाव्यात दोन भूमिका मांडल्या गेल्या. त्या देशहिताच्याच आहेत.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Saamana

(Visited 1 times, 1 visits today)
The Logical News

FREE
VIEW
canlı bahis