रस्त्याचे बेकायदा खोदकाम भोवले

शिवाजीनगर, डेक्‍कन, विमानतळ भागात कारवाई : कंपन्यांसह ठेकेदारावर गुन्हा

पुणे – शहरातील खोदलेले रस्ते आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या राडारोड्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. कंत्राटदारांच्या कारभारावर आता वाहतूक शाखेने तोडगा काढला आहे. बेकायदेशीर पद्धतीने रस्त्याचे खोदकाम करून वाहतूक कोंडीमध्ये भर घालणाऱ्या दोन कंत्राटी कंपन्या आणि कंत्राटदारावर वाहतूक पोलिसांनी कलम 283 नुसार कारवाई केली आहे.

शहरात विविध ठिकाणी पुणे महापालिका, पुणे स्मार्ट सिटी, मेट्रो, एमएनजीएल, एलटी आदी संस्थांकडून विकासकामे सुरू आहेत. त्यांनी कामाचे कंत्राट विविध ठेकेदार आणि कंपन्यांना दिले आहे.
संबंधित कंपन्यांना वाहतूक शाखेकडून ना-हरकत पत्र घेणे अनिवार्य आहे. या ना-हरकतपत्रात नमूद केलेल्या अटींनुसार, कंपन्यांनी कामे विहित मुदतीत आणि योग्य ती सुरक्षा घेऊन आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेत काम करणे आवश्‍यक असते. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करण्यात येते.

रस्त्यांवर होणाऱ्या खोदाई, बांधकाम कामांमुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याने परिणामी वाहनचालक, पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी वाहतूक विभागांतील रस्त्यांवर विनापरवाना खोदकाम करणारे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण ठेकेदार, कंपनी यांच्या कामाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे केलेल्या पाहणीत ठेकेदार, कंपन्यांनी विनापरवाना आणि ना-हरकत पत्रातील अटींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवाजीनगर आणि डेक्कन वाहतूक विभागाकडून मोतीलाल इन्फ्रास्टक्‍चर या कंपनीविरोधात शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये, विमानतळ वाहतूक विभागाकडून ए.एल.एन. इंजिनिअर्स असोसिएट्‌स या कंपनीवर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आणि भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडून काशिनाथ सीताराम कुमावत या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांनो, येथे करा तक्रार…
शहरातील रस्त्यांवर सुरू असणाऱ्या खोदकामाच्या ठिकाणी अनेकदा संबंधित ठेकेदारांनी कामाबाबत पूर्व सूचना देणारे आणि विहित मुदत कालावधीचा फलक न लावलेले, कामाचा राडारोडा रस्त्यावर ठेवल्याचे नागरिकांना आढळून आल्यास त्याबाबत वाहतूक नियंत्रण कक्ष येथे 020-26684000 आणि 020-26685000 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Dainik Prabhat

The Logical News - TLN

FREE
VIEW
canlı bahis